Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण


स्वतंत्र भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आज सबंध जगातील विविध क्षेत्रातून आदरांजली वाहण्यात येत आहे. ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रथम स्मृतिदीनी अनेकांमार्फत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. कलामांच्या स्मृतिदिनी रामेश्वर येथे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू आणि मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. दरम्यान कलामांच्या विचारांशी निगडीत इतर अनेक कार्यक्रमांचे आणि व्याख्यानमालांचेही आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर १९३१ ते २७ जुलै २०१५ या जीवनप्रवासात खडतर प्रवास, त्यातून संपादन केलेले यश, इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे व्यक्तिमत्त्व आणि अनेकांच्या मनात अनंत काळासाठी मिळवलेले आदराचे स्थान यांमुळे कलाम नेहमीच स्मरणात राहणार आहेत. जनहितासाठी, देशहितासाठी आणि देशातील तरुणाईला नेहमीच प्रेरित करण्यासाठी कलामांनी त्यांचे जीवन अर्पिले होते. देशातील ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ या क्षेपणास्त्राच्या यशस्वी निर्मिती व उड्डाणातही डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत कलाम ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणूनही ओळखले जायचे. देशातील तरुण पिढी आणि कलाम यांच्यातील नाते काही वेगळेच होते, म्हणूनच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आजच्या घडीलाही अनेक तरुणांचे आदर्श आहेत. याच आदर्शाच्या सन्मानार्थ भारताला २०२० साली महासत्ता बनवण्याच्या कलामांनी पाहीलेल्या स्वप्नाला साकार करण्यासाठी अनेक तरुण नेटाने प्रयत्नशील आहेत.
कोणत्याही कार्यक्रमात वक्ता म्हणूनही कलाम प्रेक्षकांसमोर अतिशय प्रभावीपणे आपल्या संभाषण कौशल्यातून उपस्थिताशी संवाद सादत असत. त्यांच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीमुळे आणि प्रत्येकाला आपलेसे करुन बोलण्याच्या सवयीमुळे ते श्रोत्यांमध्ये बरेच प्रसिद्ध होते. राजकारण हा जरी त्यांच्या अख्त्यारीतला विषय नसला तरीही याच राजकारणाच्या माध्यमातून कलामांच्या कारकिर्दीत देशाने एका समृद्ध राष्ट्रपतीचा काळ अनुभवला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशा या नेतृत्त्वाच्या अनुपस्थितीची खळगी जरी सलत असली तरीही विविध सोशल नेटवर्किंग साइट्स आणि माध्यमांद्वारे जनसमुदायाकडून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धासुमने अर्पण केली जात आहेत. #APJAbdulkalam अंतर्गत ट्विटरवर कलामांना आदरांजली वाहण्यासाठी अनेकांनी एकच गर्दी केली आहे.

1 comment:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email