Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

शरीरात औषधे सोडण्यासाठी विविध आकाराची यंत्रे

शरीरात विशिष्ट ठिकाणी औषधे सोडण्यासाठी सूक्ष्म यंत्रे पाठवण्याची कल्पना मांडण्यात आली असून त्यांची रचनाही करण्यात आली आहे. त्यात हृदयाच्या रक्तवाहिन्यामधील अडथळेही दूर करणे शक्य होणार आहे. जगातील वैज्ञानिकांनी मानवी शरीरात प्रवेश करू शकतील अशी सूक्ष्म यंत्रे तयार करण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. चिरफाड करून अनेकदा शस्त्रक्रिया कराव्या लागतात, त्या टाळण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकेल
कारण औषधे विशिष्ट ठिकाणी सोडून शरीरातील बिघाड दूर करता येईल. एपीएफएल व एटीएच या झुरीच मधील संस्थांच्या वैज्ञानिकांनी जैवप्रेरित यंत्रे तयार करण्याची पद्धत शोधली आहे. त्यात काही प्रगत वैशिष्टय़े आहेत. सूक्ष्म यंत्रमानवांच्या चाचण्या घेण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणावर अशी सूक्ष्म यंत्रे तयार करता येतील त्यांच्या हालचाली विद्युतचुंबकीय लहरींनी नियंत्रित करता येतील. उष्णतेच्या मदतीने त्यांचे आकार बदलता येतील. नेहमीच्या रोबोट म्हणजे यंत्रांपेक्षा ते मऊ, लवचीक व मोटरचा समावेश नसलेले राहतील. जैवानुकूल हायड्रोजेल व चुंबकीय नॅनोकणांपासून ते तयार केले जातील. नॅनो कणांमुळे  या यंत्रांना पाहिजे तसा आकार देता येईल. विद्युतचुंबकीय बलाचा पुरवठा करताच ते सहज हालचाली करू शकतील. नॅनोकण जैवानुकूल हायड्रोजेलच्या स्तरांमध्ये बसवले जातात त्यानंतर त्यांना विद्युतचुंबकीय बल देऊन ते विशिष्ट दिशेने फिरवले जातात त्यानंतर पॉलिमरायजेशन म्हणजे बहुलकीकरण करून हायड्रोजेल घट्ट केले जाते. नंतर सूक्ष्म यंत्रमानव पाण्यात सोडला जातो त्यानंतर नॅनोकणांची दिशा आणखी बदलून त्रिमिती रचना तयार होते अंतिम आकार मिळाल्यानंतर त्याला विद्युतचुंबकीय बल जोडले जाते  त्यामुळे हे सूक्ष्म यंत्रे पुढे जातात. त्यांना उष्णता दिली असता ते आकार बदलतात व त्यांच्यातील औषध बाहेर टाकले जाते. आफ्रिकन ट्रायपॅनोमियासिस ज्यामुळे होतो त्या जिवाणूची नक्कल या सूक्ष्म यंत्रात केलेली असते. या जिवाणूत फ्लॅजेलम इंधनाच्या रूपात असते पण तो माणसाच्या रक्तप्रवाहात टिकू शकतो. त्याच्या वर्तनाची नक्कल यात केली आहे. लेसरने उष्णता दिली असता फ्लॅजेलमसारखा घटक सूक्ष्म यंत्राभोवती लपेटला जातो व लपवला जातो. विविध आकारांच्या सूक्ष्म यंत्राची चाचणी केली जात असून त्यांची गतिशीलताही तपासली जात आहे, असे इपीएफएलचे सेलमान साकार यांनी सांगितले. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email