Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

गेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली


गेको या सरडय़ाची नवी प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली आहे. जैवविविधता असलेल्या कावरधा जिल्ह्य़ातील भोरामदेव वन्य अभयारण्यात ती सापडली असून त्या सरडय़ांची संख्या जास्त असल्याने तेथील परिसंस्था त्यांच्या रक्षणासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी ही प्रजाती मध्यप्रदेशात व्याघ्रगणनेच्या वेळी सातपुडा पर्वतराजीत सापडली होती. वन विभागाच्या मते गेको सरडय़ांचे रक्षण
करण्याचा प्रस्ताव प्राणीसर्वेक्षण विभागाकडे मांडला जाणार आहे. कावरधा विभागीय वन अधिकारी आलोक तिवारी यांनी ही प्रजाती सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युब्लेफेरिस सातपुरानेसिस -गेको ही प्रजाती या भागात आधी सापडली नव्हती, पण आता ती सापडली आहे, ही चांगली गोष्ट आहे. सरीसृप प्राण्यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे व भारतीय प्राणीसर्वेक्षण संस्थेला वनविभाग गेको सरडय़ांबाबत प्रस्ताव पाठवणार असून त्यांच्या संवर्धनासाठी तंत्रही सुचवणार आहे. भोरमदेव येथील परिसंस्था या सरडय़ांना अनुकूल आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते स्थानिक पथके वन क्षेत्रात पाठवून निरीक्षण करणे आवश्यक आहे. एक अभ्यासगट याबाबत अहवाल सादर करणार आहे. स्थानिक लोकांना हा प्रदेश नीट माहिती असून पक्षी व सरीसृप प्राण्यांचा ते अभ्यास करू शकतात. ‘नोव्हा नेचर सोसायटी’ ही संस्था व्याघ्रगणनेवर काम करीत असून साप व सरडे यांच्यावरही संशोधन करीत आहे; त्यात त्यांना गेको ही प्रजाती सापडली आहे.
या संस्थेने आतापर्यंत सापांच्या व सरीसृप प्राण्यांच्या ३२ प्रजाती ४ वर्षांत शोधल्या आहेत. या संस्थेचे अध्यक्ष एम. सूरज यांनी सांगितले की, छत्तीसगडचा भाग जैवविविधतेने नटलेला आहे. या वेळी गेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती सापडली आहे. ती आधी २०१४ मध्ये मध्यप्रदेशात सातपुडा व्याघ्र प्रकल्पात सापडली होती, आता ती छत्तीसगडच्या भोरामदेव अभयारण्यातही सापडली आहे, ही प्रजाती विषारी नाही, तिचा रंग आकर्षक आहे. इतर प्रजातीही तेथे असून त्यांचा अभ्यास चालू आहे.

1 comment:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email