Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

रशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी


रशियाच्या आठ वेटलिफ्टर्सना रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्तेजक प्रकरणी हे सर्व खेळाडू दोषी आढळले आहेत. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे, की उत्तेजक प्रकरणांमुळे वेटलिफ्टिंग या खेळाची प्रतिष्ठा अनेक वेळा धुळीस मिळाली आहे. त्यातही रशियन खेळाडूंनी अनेक वेळा या खेळाच्या प्रतिमेस धक्का पोहोचविला आहे.
त्यामुळेच या खेळाचा नावलौकिक जपण्यासाठी रशियाच्या दोषी खेळाडूंवर बंदी घातली आहे. आतापर्यंत रशियाच्या ११७ खेळाडूंवर बंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामध्ये अ‍ॅथलेटिक्समधील ६७ खेळाडूंचा समावेश आहे. बंदी घातलेल्या वेटलिफ्टर्समध्ये ओलेग चेन, अ‍ॅडम मालिगोव्ह, रुझलान अल्बीगोव्ह, डेव्हिड बेडझानियन, आर्तेम ओकुलोव्ह या पुरुष खेळाडूंचा तर तातियाना काशिरिना, तिमा तुरियेवा, अ‍ॅनास्ताशिया रोमानोव्हा या महिलांचा समावेश आहे. ओकुलोव्ह हा जागतिक सुवर्णपदक विजेता खेळाडू आहे. अल्बीगोव्हाने लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते. याच स्पर्धेत काशिरिनाने रौप्यपदकाची कमाई केली होती.
उत्तेजक प्रकरणांमुळे रशियावर सरसकट बंदी घालावी, अशी मागणी अमेरिका, कॅनडा यांच्यासह अनेक देशांनी केली होती. मात्र रशियाला जागतिक स्तरावर असलेले मोठे स्थान लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्यांच्यावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय न घेता प्रत्येक खेळाच्या आंतरराष्ट्रीय महासंघाकडे रशियन खेळाडूंना परवानगी देण्याची जबाबदारी टाकली.
‘ऑलिम्पिक चळवळ ही जागतिक स्तरावर असलेली अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा असल्यामुळे ताच्या प्रतिष्ठेस तडा जाऊ नये या दृष्टीनेच आम्ही रशियाच्या दोषी खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेण्यापासून मज्जाव केला आहे,’ असे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने म्हटले आहे.

बंदीची कारवाई झालेला रशियाचा जलतरणपटू उत्तेजक चाचणीत दोषी
लॉस एँजेलिस : सरकार पुरस्कृत उत्तेजक सेवनप्रकरणी बंदीची कारवाई झालेला रशियाचा जलतरणपटू नव्याने घेण्यात आलेल्या चाचणीत दोषी आढळल्याचे अमेरिकेच्या उत्तेजक विरोधी संघटनेने (युसाडा) स्पष्ट केले. निकिता लोबिन्टसेव्ह या रशियाच्या जलतरणपटूवर रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फिना अर्थात आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने त्याच्यावर ही कारवाई केली. मेलडोनियम या प्रतिबंधिक उत्तेजकाचे अंश निकिताच्या नमुन्यात सापडल्याचे स्पष्ट झाले. युसाडाने याप्रकरणी आणखी बंदी घातलेली नाही.
गुरुवारी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ संघाने निकिता लोबिन्टसोव्ह आणि व्लादिमीर मोरोझोव्ह यांच्यावर बंदी घातल्याचा निर्णय जाहीर केला. निकिता गेली सात वर्षे मेलडोनियमचे सेवन करत असल्याचे युसाडाने स्पष्ट केले. २०१६ वर्षांच्या सुरुवातीला वाडा अर्थात जागतिक उत्तेजकविरोधी संघटनेने उत्तेजकांमध्ये मेलडोनियचा प्रतिबंधित उत्तेजकांमध्ये समावेश केला. रशिया संघाच्या डॉक्टरांनीच निकिताला मेलडोनियमचा समावेश असलेल्या औषधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला होता.
‘कामगिरी उंचावण्यासाठी मेलडोनियम वापराचे प्रमाण वाढले होते. काही विशिष्ट उपचारांसाठी मेलडोनियमचा उपयोग करण्यात येतो. मात्र मेलडोनियम सेवनाने कृत्रिमरीत्या शारीरिक क्षमता वाढवता येतो हे सिद्ध झाल्याने त्याचा प्रतिबंधिक उत्तेजकांमध्ये समावेश करण्यात आला’, असे युसाडाने स्पष्ट केले.
निकिताने १० महिन्यांपूर्वी मेलडोनियमचा वापर करणे थांबवल्याचे युसाडाला सांगितले. रशियाच्या खेळाडूंना मेलडोनियम सहजपणे उपलब्ध असल्याचे उघड झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर मेलडोनियमचा वापर केल्याचेही निकिताने सांगितले.
निकिता आणि मोरोझोव्ह सातत्याने दोनदा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्यांच्या जलतरणातील कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोघांबद्दलचे वास्तव धक्कादायक आहे अशा शब्दांत अमेरिकेच्या जलतरण संघाचे प्रशिक्षक डेव्ह सालो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

2 comments:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email