Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

डॉ. एनजीपी राव


खरे तर हवामान बदलाच्या काळात कृषी क्षेत्राचा विचार करणे फार आवश्यक आहे. आपल्याकडची शेती पावसावर अवलंबून आहे. यंदा पाऊस पडत आहे हे ठीक; पण तो काही भागांमध्ये जास्त आहे, काही भागांत फारच कमी आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या प्रजातींचे संशोधन करण्यास महत्त्व आहे. हे काम करणाऱ्यांपैकी एक असलेले कृषी वैज्ञानिक डॉ. नीलमराजू गंगाप्रसाद राव यांचे नुकतेच हैदराबाद येथे निधन
झाले. वयाच्या ८९ वर्षीही ते कार्यरत होते. कोरडवाहू जमिनीत कोणती पिके घेता येतील याबाबत त्यांचे मूलभूत व उपयोजित संशोधन होते; त्याचा खूप मोठा फायदा भारतीय कृषी क्षेत्राला झाला. भारतातील संकरित ज्वारीचे निर्माते अशी त्यांची ओळख आजही आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्य़ात कोरिसापाडू येथे झाला, तर शिक्षण बापटला येथील कृषी महाविद्यालयातून झाले. नंतर त्यांनी नवी दिल्लीतील इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्च इन्स्टिटय़ूट व बिहार विद्यापीठातून पुढे शिक्षण घेतले. त्यांना चंद्रशेखर आझाद कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाने मानद डॉक्टरेटही दिली होती.
ज्वारीच्या सीएसएच १, सीएसएच ५ व सीएसएच ९ अशा प्रजाती त्यांनी शोधून काढल्या, त्या फार लोकप्रिय झाल्या. भारतात जवळपास ८ ते १० दशलक्ष हेक्टर क्षेत्रात या प्रजातींची लागवड आहे. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन १९७० ते १९८० या काळात खूप वाढले. भरपूर पाणी लागणाऱ्या गहू व तांदळाचे उत्पादन आधी जास्त होते, पण राव यांच्या संशोधनामुळे ज्वारीचेही उत्पादन त्यांच्या तोडीस तोड वाढवण्यात यश आले ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती.
खरीप ज्वारीच्या उत्पादनात त्यांच्या संशोधनामुळे बरीच प्रगती झाली, त्यामुळे बियाणे उद्योगालाही फायदा झाला. एस ३५ ही ज्वारीची एक प्रजाती पश्चिम आफ्रिकेतील दुष्काळी भागात वाढते, त्याची लोकप्रियता वाढवण्यात राव यांचा मोठा वाटा होता. कोरडवाहू भागातील पीक पद्धतीत त्यांनी बदल केले. त्यात एरंड, चवळी, देशी कापूस यांची लागवड सुरू केली. त्यांच्या नावावर दोनशे संशोधन निबंध प्रसिद्ध असून संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना, एआयआरआय, ज्वारी प्रकल्प समन्वयक, नायजेरिया, पश्चिम आफ्रिका या भागांतील विद्यापीठांमध्ये त्यांनी मार्गदर्शनाचे काम केले होते.
परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. सी. सुब्रह्मण्यम सुवर्णपदक, एस. एस. भटनागर जैविक विज्ञान पुरस्कार, रफी अहमद किडवई वनस्पती पुरस्कार,  वासविक कृषी विज्ञान पुरस्कार, आत्मगौरव पुरस्कार, उत्कृष्ट कृषी वैज्ञानिक पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.
नवी दिल्ली येथील इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी, अलाहाबाद येथील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या नामांकित संस्थांचे ते फेलो होते.

2 comments:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email