Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी कालवश


हयातभर देशभरातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि त्यांच्या दबक्या जगण्याला लेखनातून आवाज निर्माण करून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां आणि ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी (९०)  यांचे गुरुवारी कोलकाता येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोलकात्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सावकार, जमीनदार अशा
मूठभर वर्गाकडून आदिवासींवर होत असलेले अत्याचार त्यांनी आपल्या लेखणीद्वारे जगासमोर आणले. ब्रिटिश काळापासून आदिवासी जमातींच्या होणाऱ्या शोषणावरील  ‘अरण्येर अधिकार’ आणि पश्चिम बंगालमधील नक्षलवादी चळवळीवरील ‘हजार चुराशीर माँ’ या त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या कलाकृती. महाश्वेता देवी यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारासह पद्मविभूषण, मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील आदिवासींचे प्रश्न साहित्यातून मांडून प्रसंगी त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी लढा दिला. महाश्वेता देवी यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाक्यामध्ये झाला. त्यांच्या घरामध्येच साहित्यिक वातावरण होते. महाश्वेता देवी यांचे संपूर्ण कुटुंब पश्चिम बंगालमध्ये येऊन स्थायिक झाले. तिथेच त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कोलकाता विद्यपीठातून इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यावर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून नोकरी केली.
महाश्वेता देवी यांनी विविध बंगाली मासिकांमधून तरुण वयातच लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली. ‘झाँशी की रानी’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर, आपण कथाकार होऊ , हे आपल्याला समजल्याचे खुद्द त्यांनीच म्हटले होते. महाश्वेता देवी यांचे लघुकथेचे २० संग्रह, त्याचबरोबर बंगाली भाषेत १०० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅॅनर्जी यांनी महाश्वेता देवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मी माझा वैयक्तिक मार्गदर्शक गमावला असल्याची प्रतिक्रिया बॅनर्जी यांनी दिली.
महाश्वेता देवी यांच्या लेखणीत कमालीची शक्ती होती. त्यांच्या लेखणीत करुणा, समता आणि न्यायाचा आवाज होता. त्यांच्या जाण्याने अतिशय दु:ख झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण भागात त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच भाग व्यतित केला. आपल्या कथा कादंबऱ्यांद्वारे त्यांनी मुख्य प्रवाहापासून विलग झालेल्या समाजजीवनाचे अस्सल चित्रण केले.
अग्निगर्भ, रुडाली या त्यांच्या कादंबऱ्याही मोठय़ा प्रमाणावर गाजल्या. त्यांच्या कथन साहित्यावर चित्रपटही करण्यात आले आहेत.  समाजकार्य आणि लेखणी या दोन्ही आघाडय़ांवर त्या एकाच वेळी कार्यरत होत्या. त्यांनी अनेक आदिवासी समुदायांचे संघटन केले. तसेच त्यांच्या हक्कांसाठी सरकारदरबारी गाऱ्हाणे मांडले.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात २००६ साली झालेल्या सिंगूर आंदोलनानंतर, त्यावेळेस ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या महाश्वेता देवी या त्यांच्या सल्लागार बनल्या. ममता नियमितपणे त्यांचा सल्ला घेत असत. त्या कठीण काळात ममतांसोबत उभ्या राहिलेल्या बुद्धिवाद्यांच्या गटामध्ये त्या सगळ्यात उत्तुंग व्यक्तिमत्व होत्या. तृणमूल काँग्रेस २१ जुलैला आयोजित करत असलेल्या ‘शहीद दिवस’ कार्यक्रमात त्या प्रामुख्याने हजर असत. बंगालच्या आदिवासींकरता, विशेषत: लोधा व शाबार समुदायाकरिता असलेल्या कल्याण योजनांच्या प्रचारासाठी संशोधन, लेखन व प्रचार यांत त्यांनी अनेक वर्षे घालवली.
त्यांच्या या साहित्यीक योगदानासाठी १९९६ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर त्याच्या पुढच्याच वर्षी मॅगसेसे पुरस्कारही त्यांना मिळाला. हे दोन्ही पुरस्कार पटकाविणाऱ्या त्या एकमेव आहेत. आदिवासी जमातींच्या सबलीकरणासाठी, त्यांना माणूस म्हणून व्यवस्थेत प्रतिष्ठा व संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी सुमारे चार दशकांहून अधिक काळ सृजनशील लढा दिला. या जमातींमधील लेखनाला वाहिलेले ‘बोर्टिका’(मराठीत अर्थ- दिवा) हे नियतकालिकही गेली सुमारे तीन दशके त्या संपादित करत होत्या. महाश्वेता देवींनी या जमातींच्या हक्कांसाठी आपल्या लेखनाने व सामाजिक कार्याने सृजनशील दिवा प्रज्वलीत केलाच आहे. गरज आहे ती, तो विझू न देण्याची.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email