Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

चार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार


१ अब्ज डॉलर्स मोजणार; सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल . भारताने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत बुधवारी अमेरिकेच्या ‘बोइंग’शी चार ‘पी-८आय’ लढाऊ विमानांसाठी करार केला. एक अब्ज डॉलर्स मोजून भारत ही चार विमाने खरेदी करणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा संबंध दृढीकरणासाठी हा करार महत्त्वाचा असल्याचे मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या जूनमध्ये झालेल्या बैठकीत विमान खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी ‘पी-८आय’ ही पाणबुडीविरोधी लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार करण्यात आला. याआधी २००९ मध्ये २.१ अब्ज डॉर्लसना खरेदी केलेली अशी आठ लढाऊ विमाने मे २०१३ आणि ऑक्टोबर २०१५ मध्ये नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. त्यात या चार शस्त्रसज्ज विमानांची भर पडणार आहे. या करारानुसार ‘पी-८आय’ विमाने तीन वर्षांत नौदलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यामुळे नौदलाच्या सामर्थ्यांत वाढ होणार आहे. शिवाय सागरातील चीनच्या वर्चस्ववादाला चाप बसणार आहे.
सध्या नौदलाकडील अशी आठ विमाने हिंदी महासागर परिसरात कार्यरत आहेत. सुमारे १,२०० सागरी मैल परिसरात टेहळणी व सुरक्षेचे काम या विमानांद्वारे करण्यात येते. ही विमाने तामिळनाडूतील आरक्कोनम येथील नौदलाच्या तळावर तैनात असतात. २२ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेल्या एएन-३२ या विमानाच्या शोधासाठीही या विमानांची मदत घेण्यात येत आहे.
दहा वर्षांत १५ अब्ज डॉलर्सचे करार
भारताने गेल्या वर्षी १५ हेलिकॉप्टरसह इतर संरक्षण सामग्रीसाठी अमेरिकेसोबत ३ अब्ज डॉलर्सचा करार केला होता. त्यापाठोपाठ हा १ अब्ज डॉलर्सचा करार आहे. यामुळे गेल्या दहा वर्षांत भारताचा अमेरिकेसोबतचा विमानांसह शस्त्रसामग्रीचा करार १५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email