Pages

Follow by Email

Saturday, 4 June 2016

दोन भारतीय महिला उद्योजिकांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश

आपल्या मेहनतीच्या बळावर उद्योगक्षेत्रात नवीन उंची गाठणाऱ्या अमेरिकेतील ६० श्रीमंत आणि यशस्वी महिलांची यादी फोर्ब्सने जाहीर केली असून, मूळ भारतीय असलेल्या दोन महिलांचा यात समावेश आहे. नाविन्यपूर्णता आणि शोधाचा ध्यास या दोन मूलभूत गोष्टींच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले. भारतात जन्मलेल्या निरजा सेठी या यादीमध्ये १६ व्या स्थानावर, तर जयश्री उल्लाल ३० व्या स्थानावर आहेत. आपले पती भारत देसाई यांच्यासोबत निरजा यांनी आयटी
सल्लागार आणि आउटसोर्सिंग कंपनी ‘सिंटेल’ची सुरुवात केली. निरजा यांचे वय ६१ वर्षे असून, त्यांची संपत्ती १.१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या कंपनीत २५,००० कर्मचारी काम करतात. या यादीत असलेल्या ५५ वर्षिय जयश्री उल्लाल ह्या ‘अरिस्ता नेटवर्क्स’च्या अध्यक्षा आणि सीईओ आहेत. ४७ कोटी डॉलर्सची मालमत्ता असलेल्या जयश्री जेव्हा २००८ मध्ये ‘अरिस्ता नेटवर्क्स’च्या सीईओ झाल्या, तेव्हा उत्पन्नाच्या दृष्टीने कंपनीची अवस्था वाईट होती. त्यावेळी ५० पेक्षादेखील कमी कर्मचारी कंपनीत कामाला होते. परंतु २०१५मध्ये कंपनीचे उत्पन्न ८३.८० कोटी डॉलर्सवर पोहोचले. २०१४मध्ये कंपनीची शेअरबाजारामध्ये नोंदणी करण्यात आली. स्वत:च्या मेहनतीवर उद्योगक्षेत्रात उंची गाठणाऱ्या अमेरिकेतील श्रीमंत महिलांच्या या यादीत सर्वात वरच्या स्थानावर डिआन हेंड्रिक्स यांची वर्णी लागते. त्या ‘एबीसी सप्लाय’च्या मालकीण आहेत. छत आणि स्लायडिंगसाठी उपयोगात येणाऱ्या वस्तुंच्या त्या सर्वात मोठ्या घाऊक वितरक आहेत. त्यांची सांपत्तीक स्थिती ४.९ अब्ज डॉलर्स इतकी आहे. अमेरिकेतील या ६० धनवान महिलांची एकंदर संपत्ती जवळजवळ ५३ अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे म्हटले आहे. या कर्तृत्ववान महिलांनी मेहनत आणि नावीन्याच्या जोरावर देशात काही मोठे ब्रॅण्ड निर्माण केले. तर काही महिलांनी फेसबुक, गुगल आणि इबेसारख्या कंपन्यांच्या यशस्वी वाटचालीत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email