Pages

Follow by Email

Thursday, 9 June 2016

लोकसभा आणि सर्व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी !


नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा आणि सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या कायदा मंत्रालयाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना मार्च महिन्यात भाजपच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मांडली होती. वेगवेगळ्या वेळी विविध राज्यांमध्ये होणा-या निवडणुकांमुळे सरकारच्या
कामावर परिणाम होतो. त्यामुळे एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याची मागणी पुढे आली होती.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कायदा मंत्रालयाला दोन पानी पत्र पाठविले असून त्यामध्ये प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. जर सर्व पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि यावर एकमत झाले तर निवडणूक आयोगालाही देशात लोकसभा आणि राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यामध्ये कोणतीही अडचण नाही, असे निवडणूक आयोगाने पत्रामध्ये लिहिले आहे. कायदा मंत्रालयाशी संबंधित सांसदीय समितीच्या ७९ व्या अहवालामध्ये देशात एकाच वेळी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात आला आहे.

या अहवालावर कायदा मंत्रालयाने निवडणूक आयोगाचे मत मागविले होते. निवडणूक आयोगाने एकत्रित निवडणुका घेण्याला पाठिंबा दिल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान आपल्या घोषणापत्रात आश्वासन दिले होते की, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देशभरात एकाच वेळी घेण्यात येतील, अशा योजनेवर काम करू; पण केंद्रात भाजपचे सरकार येऊन दोन वर्षे झाली तरी या विषयावर केंद्राने अजून कोणतेही ठोस पाऊल उचलले नव्हते. आता निवडणूक आयोगानेदेखील देशभरात निवडणुका एकाच वेळी घेण्यासासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email