Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

रिओ वारी अखेर नरसिंगचीच

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीच्या ७४ किलो वजनी गटात नरसिंग यादवच भारताचे प्रतिनिधित्व करणार यावर सोमवारी उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. ऑलिंपिकला जाण्यासाठी चाचणी घेण्याची दोनवेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशीलकुमार याची याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळली.ऑलिंपिक स्पर्धा ऐन तोंडावर असताना चाचणी घेणे योग्य नाही. त्यामुळे दोन्ही कुस्तीगीर
मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्‍यता अधिक आहे. तसेच दुखापतीचादेखील धोका आहे, त्यामुळे ऑलिंपिक कोटा मिळणारा नरसिंगच योग्य उमेदवार आहे, असे न्यायालयाने आज स्पष्ट केले. जागतिक महासंघाकडून वजनी गटात बदल झाल्यावर सुशीलने ७४ किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नरसिंग आधीपासूनच या वजनी गटातून खेळत होता. त्याचबरोबर सुशील या वजनी गटातून फारशा लढती खेळलेला नव्हता. जागतिक स्पर्धेतूनही त्याने माघार घेतली होती. जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक मिळवून नरसिंगने देशासाठी ऑलिंपिक कोटा मिळविला. मात्र, त्याचवेळी सुशीलने या वजनी गटातून आपल्याला संधी मिळावी, असा दावा करून चाचणीची मागणी केली होती. महासंघाने मात्र ती फेटाळून लावल्याने सुशील न्यायालयाची पायरी चढला होता. 

सुशील कुमारला सुनावले
ऑलिंपिक संघनिवडीसाठी चाचणी लढत घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणेच असमर्थनीय आहे, तसेच ही याचिका मुद्द्यास धरूनही नव्हती, असे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मनमोहन यांनी सुशील कुमारला सुनावले. 

आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदके केवळ शक्तीचा वापर करून जिंकता येत नाहीत, तर त्यासाठी मनही पूर्ण एकाग्र असावे लागते. अखेरच्यावेळी निवड चाचणी घ्यायचे ठरवल्यास ऑलिंपिकसाठी निवड झालेल्या कुस्तीगीरांच्या मनोधैर्यावर परिणाम करेल. केवळ चाचणीची तर मागणी करीत आहोत, हे एखादा क्रीडापटू सांगतो, त्यावेळी तो निवडलेल्या खेळाडूंच्या पदक जिंकण्याचा मार्ग जास्त खडतर करीत असतो. त्याचा देशहितावर परिणाम होतो. या केवळ चाचणी घेण्याच्या मागणीने देशाचे नुकसान होत असते. हे सर्व लक्षात घेतल्यास सुशीलची मागणी न्यायास तसेच मुद्द्यास धरून नाही, त्यामुळे ती फेटाळली जात आहे, असे न्यायाधीशांनी निकाल पत्रात म्हटले आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email