Pages

Follow by Email

Wednesday, 1 June 2016

वैशिष्ट्यपूर्ण ‘फॉरमॅट’मुळे यंदाची ‘युरो’ थरारक


‘फॉन्समध्ये होणारी 15 वी युरोपियन अजिंक्यपद  स्पर्धा म्हणजेच ‘युरो-2016’चे वेध संपूर्ण फुटबॉल जगताला लागलेले आहेत. दि. 10 जून ते 10 जुलै या महिनाभराच्या कालावधीत युरोपमधील अव्वल संघ यात एकमेकांशी लढताना दिसतील. फिफा विश्‍वचषक स्पर्धेनंतर अतिशय महत्त्वाची व प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितले जाते.  वेन रुनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, इकर कॅसिलास, बुफॉन यासारख्या महान
खेळाडूंची ही अखेरची स्पर्धा असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर  पॉल पोग्बा, हॅरी केन, गोटसे, डी ब्रूयने, इडन हझार्ड, जेमी वॉर्डी या नवोदित खेळाडूंना त्यांची ओळख जगाला करून देण्याची सुवर्णसंधी असेल.
  असा असेल यंदाचा फॉरमेट 
 विश्‍वचषक स्पर्धेप्रमाणेच युरो स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी युरोपमधील सर्व संघांना पात्रता फेरीतून जावे लागले आहे. या अगोदर स्पर्धेत 16 संघ 4 गटांमध्ये विभागले जात होते; पण यंदाच्या स्पर्धेपासून संघांची संख्या वाढवून 24 पात्र संघ एकूण सहा गटांमध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक गटामध्ये प्रथम साखळी सामने होतील व प्रत्येक गटातील अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकांचे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. बाद फेरीसाठी  पात्र ठरलेल्या 12 संघांबरोबरच तिसर्‍या क्रमांकांवर असलेले अव्वल 4 संघसुद्धा बाद फेरीसाठी पात्र ठरतील. साखळी फेरीनंतर सहा गटांतील सहा तृतीय क्रमांकांच्या संघांमधून विविध निकषांनुसार हे 4 संघ कोणते हे ठरवण्यात येईल. 
 स्पर्धेचा इतिहास 
युरोप खंडातील देशांसाठी दर चार वर्षांनी खेळवली जाणारी ही स्पर्धा आहे. हे सर्व देश फिफा व यूएफाशी संलग्न देश असतात. युरो 
स्पर्धेचे आयोजन यूएफा म्हणजेच युरोपियन फुटबॉल असोसिएशन ही संघटना करते. 1960 साली ही स्पर्धा सुरू झाली. पहिली स्पर्धा फ्रान्स देशात केली गेली. या अगोदर फ्रान्स फुटबॉलचे प्रशासक म्हणून ओळखले जाणारे हेन्री किलॉनी यांनी 1920 साली या स्पर्धेची संकल्पना मांडली होती; पण ती 1960 पर्यंत पूर्ण झाली नव्हती. 1955 साली हेन्री डिलॉनी यांचा मृत्यू झाला व त्यांना श्रद्धांजलीच्या स्वरूपात 1960 साली या स्पर्धेची सुरुवात झाली व हेन्री डिलॉनी यांची संकल्पना पूर्णत्वास गेली.
आजपर्यंतच्या युरो स्पर्धेच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास जर्मनी संघ सर्वाधिक यशस्वी संघ म्हणता येईल. जर्मनी संघाने तीन वेळा विजेतेपद व तीन वेळा उपविजेतेपद मिळवलेले आहे. स्पेन संघाने सुद्धा तीन वेळा विजेतेपद व एका वेळेस उपविजेतेपद मिळविलेले आहे. 1960 साली आयोजित पहिल्या स्पर्धेत एकूण 17 संघ सहभागी झाले होते. यानंतर स्पर्धेतील सहभागी संघाची संख्या कमी जास्त होत होती; पण 1996 साली इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत संघांची संख्या ठरवण्यात आली. या स्पर्धेपासून एकूण 16 संघ सहभागी होऊ लागले. यंदाच्या स्पर्धेत ही संख्या पुन्हा बदलून 24 इतकी करण्यात आलेली आहे. युरोपियन देशातील फुटबॉलची वाढती लोकप्रियता व स्पर्धेमुळेच सहभागी संघांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या स्पर्धेच्या बाद व साखळी फेर्‍यांचे स्वरूप अतिश मनोरंजक व नावीन्यपूर्ण असे असल्यामुळे स्पर्धा अधिक रोमांचक होण्यास मदत होईल.
 अस्सल चांदीचा चषक
 हेन्री डिलॉनी चषक असे संबोधला जाणारा हा चषकअस्सल चांदीचा आहे. युरो चषक फिरता चषक असून चार वर्षे विजेत्या संघाकडे जातो. स्पर्धेसाठी अदिदास कंपनीचा खास बॉल तयार करण्यात आला असून त्याला बुज्यु असे संबोधले जाते. बुज्यु या फ्रेंच शब्दाचा अर्थ सुंदर खेळ असा होतो. फ्रान्सचा स्टार खेळाडू झिनेदिन झिदान याच्या हस्ते 2015 साली बॉलचे अनावरण करण्यात आले.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email