Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

रोहन बोपण्णा ‘टॉप टेन’मध्ये


नवी दिल्ली - भारताचा दुहेरीतील टेनिसपटू रोहन बोपण्णा याने जागतिक क्रमवारीत दहावे स्थान मिळविले. यामुळे रिओ ऑलिंपिकमधील त्याचा थेट प्रवेश नक्की झाला आहे. फ्रेंच ओपनमध्ये बोपण्णाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय मार्सेलो मेलो आणि इव्हान डॉडिग यांनी उपांत्य फेरीत पराभूत होणे त्याच्यासाठी आवश्‍यक होते. तसे घडले. अनुभवी लिअँडर पेसनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने पाच क्रमांक प्रगती केली. आता त्याचा ४६वा क्रमांक आहे. भारताच्या इतर खेळाडूंमध्ये पुरव राजा (१०३), दिवीज शरण (११४),  साकेत मायनेनी (१२५), जीवन नेदूंचेझीयन (१३४) आणि महेश भूपती (१६४) यांचा समावेश आहे. एकेरीत युकी भांब्रीची सहा क्रमांक घसरण झाली. त्याचा १४७वा क्रमांक आहे. साकेतने १५०वे स्थान गाठले. रामकुमार रामनाथन २२४वा आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस संयुक्त अव्वल आहेत. प्रार्थना ठोंबरे २०९व्या स्थानावर आहे. एकेरीत अंकिता रैनाने पहिल्या ३०० जणांमधील स्थान गमावले. तिची दहा क्रमांक घसरण झाली. आता ती ३०६वी आहे. 
मुगुरुझा दुसरी
महिला एकेरीत स्पेनच्या गार्बीन मुगुरुझाने फ्रेंच ओपन विजेतेपदासह दुसऱ्या स्थानावर भरारी घेतली. कारकिर्दीतील हा तिचा सर्वोत्तम क्रमांक आहे. तिने चार क्रमांक प्रगती केली. उपविजेत्या सेरेना विल्यम्सने अव्वल क्रमांक राखला. व्हीनस विल्यम्सने चौथ्या फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे तिने दोन क्रमांक प्रगती केली. आता ती नववी असून पुन्हा ‘टॉप  टेन’मध्ये तिला स्थान मिळाले.
जोकोविचचे वर्चस्व
पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अव्वल स्थान कायम राखले. अँडी मरे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर रॉजर फेडररचे तिसरे स्थान आहे. जोकोविचचे १६ हजार ९५० गुण आहेत. मरे आणि फेडरर यांच्या एकत्रित गुणांपेक्षा त्याचे गुण जास्त आहेत. मरेचे ८९१५, तर फेडररचे ६६५५ गुण आहेत. उपांत्य फेरी गाठलेल्या ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमने १५वरून सातवे स्थान गाठले.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email