Pages

Follow by Email

Friday, 10 June 2016

आजपासून ‘युरो’चा महामुकाबला

फ्रान्स-रोमानिया यांच्यात उद्घाटनीय सामना युरोपियन फुटबॉल महासंघाच्या वतीने (युएफा) घेण्यात येणाऱ्या युरोपियन अजिंक्यपद अर्थात युरो चषक फुटबॉल स्पध्रेला शुक्रवारी मध्यरात्री सुरुवात होत आहे. दहशतवादी हल्ल्याचे सावट, कामगार कायद्यातील बदलाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन आणि नैसर्गिक आपत्ती या आव्हानांवर मात करून जगाला एकजुटीचा संदेश देण्यासाठी युरोपातील अव्वल २४ संघ एकवटले आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांनी यजमान फ्रान्स आणि रोमानिया यांच्यातील लढतीने या अध्यायाला सुरुवात होणार आहे. स्टेड डे फ्रान्स स्टेडियमवर उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर ‘अ’ गटातील ही लढत खेळविण्यात येणार आहे. करिम बेंझेमा याच्याशिवाय यजमान फ्रान्सला संपूर्ण स्पध्रेत प्रतिस्पर्धी संघांचा मुकाबला करावा लागणार आहे. सेक्स-टेप ब्लॅकमेल प्रकरणात आरोपी असलेल्या बेंझेमाला अंतिम संघात स्थान देण्यात आलेले नाही. यात भर म्हणून जेरेमी मॅथीयूने माघार घेतली असून ममाडूयू साखो याच्यावर उत्तेजक सेवनप्रकरणी बंदीची कारवाई केली आहे. तसेच लॅस्सना डायरा, कर्ट झोउमा आणि मॅथीयू डेबुची यांनाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. प्रशिक्षक डिडीयर डेश्चॅम्पस् यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘‘१२ मे रोजी संघाची घोषणा झाल्यानंतर या सर्व घडामोडी घडल्या. अशा घटना घडतील असे वाटले नव्हते.’’ अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत पॉल पोग्बा, अँथोनी मार्शल आणि अँटोईने ग्रिएझमन या युवा खेळाडूंवर धुरा असणार आहे. फ्रान्सने १९९८ मध्ये विश्वचषक उंचावला होता, तर १९८४ मध्ये त्यांना अखेरचा युरो चषक पटकावता आला होता. या कामगिरीच्या पुरावृत्तीचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. ‘‘घरच्या मैदानावर आम्हाला खेळण्याची संधी मिळाली आहे. आमच्यावर दडपण असेल़, परंतु ते सकारात्मक असेल,’’ असे मत गोलरक्षक स्टिव मॅडंडाने व्यक्त केले.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email