Pages

Follow by Email

Monday, 16 May 2016

खेरशेत-बोटकेवाडीची पाणी योजना आदर्शवत


चिपळूण - "शासकीय योजनेचा लाभ न घेता तालुक्‍यातील खेरशेत-बोटकेवाडीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली नळ-पाणीपुरवठा योजना तालुक्‍यास आदर्शवत आहे. श्रमदान व लोकसहभाग केल्याने योजनेचा खर्च कमी झाला. तालुक्‍याने बोटकेवाडीतील पाणी योजनेचा आदर्श घेऊन वाटचाल करणे आवश्‍यक आहे‘‘, असे मत आमदार सदानंद चव्हाण यांनी व्यक्त केले. 
 
खेरशेत-बोटकेवाडीची लोकसंख्या दोनशेच्या घरात आहे. वाडीने एकत्र येत खासगी पाणी योजना पूर्णत्वास नेली. आज सकाळी आमदार चव्हाण यांच्या हस्ते योजनेचे उद्‌घाटन झाले. आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, शासकीय निधीतून मंजूर झालेल्या पाणी योजनांच्या उद्‌घाटनालाच आम्हाला प्रामुख्याने निमंत्रित केले जाते. लोकसहभागातून राबवलेल्या योजनेच्या उद्‌घाटनाची संधी आपल्याला दिल्याने त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. पाणी योजनांना निधी देऊनदेखील योजनेची कामे वेळेत पूर्णत्वास जात नाहीत; मात्र बोटकेवाडी ग्रामस्थांनी श्रमदान करून योजना पूर्ण केली. ग्रामस्थांनी विहीर, पाच हजार लिटर क्षमतेची साठवण टाकी व जलवाहिनीद्वारे प्रत्येक कुटुंबास नळ कनेक्‍शन दिल्याने मुबलक पाणी मिळत आहे. वाडीच्या विकासात योगदान देणाऱ्या वाडीतील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य चंद्रकांत जाधव, सरपंच संतोष मोरे, उपसरपंच नागेश साळवी, वाडीप्रमुख शंकर बोटके, अंकुश जाधव, तंटामुक्त अध्यक्ष विजय जाधव, वसंत जाधव, विजय माने, सखाराम बेंडल, मनोहर साळवी, खेरशेत कोकरे सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तुषार दळवी, सचिव संजय दळवी यांच्यासह बोटकेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email