Pages

Follow by Email

Monday, 16 May 2016

स्वदेशी बनावटीचे अवकाशयान सज्ज


तिरुअनंतपुरम - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रथमच स्वदेशी बनावटीचे अवकाशयान तयार केले आहे. या अवकाशयानासाठी कोणत्याही प्रकारे विदेशी मदत घेतली गेली नसल्याने भारताच्या अवकाश क्षेत्रातील यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे. हे अवकाशयान लवकरच प्रक्षेपित केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

एखाद्या "एसयूव्ही‘ मोटारइतका आकार आणि वजन असलेल्या या "रियूझेबल लॉंच व्हेइकल- टेक्‍नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर‘ (आरएलव्ही-टीडी) अवकाशयानाची अंतिम चाचणीही घेण्यात आली असून, श्रीहरीकोटा येथील अवकाश केंद्रात ते उड्डाणाच्या प्रतीक्षेत आहे. पुनर्वापर करता येण्यासारखे पंख हे या अवकाशयानाचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची रचना इतर देशांनी करण्याचे टाळले होते. मात्र, खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी हे आव्हान पेलत ही रचना शक्‍य करून दाखविली. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास इतर अवकाशयानांपेक्षा दहा पटींनी खर्च कमी होऊ शकतो, असा "इस्रो‘ला विश्‍वास आहे. हा खर्च प्रतिकिलो दोन हजार डॉलर इतका कमी करता येऊ शकतो. 

मॉन्सूनला सुरवात होण्याआधीच या अवकाशयानाचे उड्डाण करण्यास "इस्रो‘ प्रयत्नशील आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून हे प्रक्षेपण होईल. याद्वारे "इस्रो‘ प्रथमच अवकाशयानाचे प्रक्षेपण करणार आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर अवकाशयानाला लावलेले काही पंख (डेल्टा विंग्ज) बंगालच्या उपसागरात उतरविता येणार आहेत. या पंखांच्या रचनेमुळे ते तरंगणार नसल्याने परत आणता येणे अवघड आहे. मात्र, या प्रयोगाचा उद्देश पंखांचे तरंगणे नसून ते अवकाशयानापासून परत येणे, हा आहे. अवकाशयानाचे हे प्रारूप नियोजित अवकाशयानापेक्षा सहा पटींनी लहान आहे. हे अंतिम प्रारूप तयार करण्यासाठी दहा ते पंधरा वर्षे लागणार आहेत. 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email