Pages

Follow by Email

Wednesday, 25 May 2016

अफगाण तालिबानकडून नव्या म्होरक्‍याची घोषणा


काबूल - मुल्ला अख्तर मन्सूर या तालिबानच्या म्होरक्‍याला अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांत ठार करण्यात आल्याच्या वृत्तास अफगाणिस्तानमधील तालिबानने एका निवेदनाद्वारे पुष्टी दर्शविली आहे. 
याच निवेदनामध्ये तालिबानने मन्सूर याच्याजागी आता मुल्ला हैबतुल्ला अखुंदझादा याची नेमणूक करण्यात आल्याची घोषणाही केली आहे. अखुंदझादा हा तालिबानच्या दोन उपप्रमुखांपैकी एक असून तालिबानच्या न्यायव्यवस्थेचा प्रमुख म्हणूनही त्याने काम पाहिलेले आहे. तालिबानी नेत्यांच्या बैठकीत अखुंदझादा याच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. ही संवेदनशील बैठक पाकिस्तानमध्ये झाल्याचे मानले जात आहे. 

अफगाणिस्तानमधील कुरसिद्ध हक्‍कानी नेटवर्कचा म्होरक्‍या सिराजुद्दीन हक्‍कानी आणि तालिबानचा माजी म्होरक्‍या मुल्ला मोहम्मद ओमर याचा मुलगा असलेल्या मोहम्मद याकूब हे अखुंदझादा याचे उपप्रमुख याचे म्हणून काम पाहणार आहेत. तालिबानचा मुख्य प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने यासंदर्भातील माहिती दिली.
 
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर अमेरिकेकडून शनिवारी पहाटे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात मुल्लाह मन्सूर ठार झाला. अहमद वाल गावापासून दक्षिणेकडे हे हल्ले करण्यात आले. मन्सूर याच्यासोबत अन्य एक जणही मारला गेला आहे. मुल्लाह मन्सूर हा अफगाणिस्तानमध्ये हल्ले घडवून आणण्यात सक्रीय होता.

तालिबानी संघटनेचा प्रमुख नेता मुल्ला उमर हा ठार झाल्यानंतर मुल्लाह अख्तर मन्सूर या संघटनेचा नेता बनला होता. त्याला तालिबानमधील वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा होता. अमेरिकेवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने तालिबानी संघटनेविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील भागात अमेरिकेकडून सतत ड्रोन हल्ले करण्यात येतात. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक प्रमुख दहशतवादी ठार झाले आहेत.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email