Pages

Follow by Email

Tuesday, 31 May 2016

देशांचे 'विकसित,विकसनशील' वर्गीकरण रद्द


मुंबई: आतापर्यंत ‘विकसनशील‘ गटात मोडणारा भारत देश लवकरच दक्षिण आशियातील ‘कमी-मध्यम उत्पन्ना‘चा देश म्हणून ओळखला जाऊ शकतो. सध्या जगभरातील देशांचे आर्थिक भरभराट आणि राहणीमानाच्या आधारावर विकसित आणि विकसनशील असे दोनच गट पडतात. परंतू जगभरातील अर्थव्यवस्थांची नेमके, अधिक स्पष्ट वर्गीकरण करण्यासाठी जागतिक बँकेने नवी आर्थिक परिभाषा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन विकसनशील अर्थव्यवस्थांच्या वैशिष्ट्यांमधील लक्षणीय फरक लक्षात घेत जागतिक बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. उदाहरणार्थ, भारत, मेक्सिको आणि मलेशिया या तीन देशांच्या काही वैशिष्ट्यांमध्ये साम्य असले तरीही तेथील परिस्थितीत मोठा फरक आहे.  

अर्थव्यवस्थांमधील एकसंधता दिवसेंदिवस कमी होत चालल्याने बदलत्या जगाचे विशिष्ट गुणधर्म टिपण्यासाठी देशांचे भौगोलिक प्रदेश आणि उत्पन्नावर आधारित वर्गीकरण केले जाणार आहे. जागतिक बँकेने विकास निकषांबाबतच्या वार्षिक अहवालात देशांचे विकसित किंवा विकसनशील असे वर्गीकरण रद्द केले आहे.

एकेकाळी, जन्मदर आणि बालमृत्यू दरासारखी मानके देशाची भरभराट मोजण्यासाठी वापरली जात. परंतू याबाबतीत अनेक देशांची परिस्थिती सुधारत असल्याने याद्वारे विकसित आणि विकसनशील देशांमधील नेमका फरक अधोरेखित करता येत नाही. 

जागतिक बँकेच्या माहितीनुसार, भारत देश कामगारांच्या सहभागाचे प्रमाण, वीज उत्पादन आणि स्वच्छतेच्या सुविधांची उपलब्धी इत्यादी बाबींवर पिछाडीवर आहे. देशातील केवळ 40 टक्के नागरिकांना स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा आकडा 68 टक्के आहे. परंतू आता देशात पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण आणि मातांच्या मृत्यूचे प्रमाण आता कमी झाले आहे. तसेच भारतात कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी 29 दिवसांचा काळ जावा लागतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा कालावधी सरासरी 20 दिवस आहे. 

जागतिक बँकेच्या पावलावर पाऊल टाकत संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे नवी व्याख्या अधिकृतपणे स्वीकारली जाऊ शकते. परंतू निरीक्षणासाठी सध्या संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे हीच व्याख्या वापरली जात असून जगातील 159 देश विकसनशील गटात मोडतात. शिवाय, दरडोई उत्पन्न, मानवी भांडवल आणि आर्थिक अगतिकतेच्या आधारावर किमान विकसित राष्ट्रे अशीही यादी केली जाते. 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email