Pages

Follow by Email

Monday, 30 May 2016

महिला सुरक्षेसाठी आता ‘पॅनिक बटण’

महिलांच्या डब्यात नवीन सुविधा; बटण दाबल्यानंतर डब्याबाहेरील सिग्नलद्वारे सूचना उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान महिलांवर होणारे हल्ले आणि विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी आता मध्य रेल्वेने महिलांसाठी पॅनिक बटणाची सोय केली आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेतील दोन अधिकाऱ्यांनी तयार केलेले हे बटण एका गाडीतील सर्व महिला डब्यांमध्ये बसवण्यात आले आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत हे बटण दाबल्यानंतर डब्यावर बाहेरील बाजूने बसवलेला दिवा चालू होतो. त्याचप्रमाणे धोक्याचा संकेत देणारी घंटाही वाजू लागते. तसेच हे बटण दाबल्यानंतर गार्ड आणि मोटरमनच्या डब्यातही
महिलांच्या डब्यात काय घडत आहे, हे दिसू शकेल. मुंबईत रात्री-अपरात्री महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर हल्ले होणे किंवा त्यांचा विनयभंग होणे, असे प्रकार घडले आहेत. धावत्या गाडीत महिलांना कोणाकडे मदत मागणेही शक्य नसते. त्यामुळे अशा महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेच्या विद्युत विभागातील अस्मिता श्रीवास्तव आणि सूद या दोन अधिकाऱ्यांनी एक नवीन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेत महिलांच्या डब्यात दोन आसनांच्या मध्ये लाल रंगाचे एक ‘पॅनिक बटण’ बसवण्यात आले आहे. महिलांसह काही अनुचित प्रकार घडत असेल तर महिलांनी हे बटण दाबायचे आहे. ते दाबल्यानंतर डब्याबाहेर बसवलेला धोक्याची सूचना दिवा प्रज्वलित होणार आहे. त्याचप्रमाणे धोक्याचा गजरही वाजायला लागेल. तसेच हे बटण सक्रिय होताच मोटरमन व गार्ड यांच्या केबिनमध्ये निळा दिवा लागून त्यांना या डब्यात नेमके काय घडत आहे, हे दिसेल. त्यामुळे महिलांपर्यंत तातडीने मदत पोहोचणे शक्य होणार आहे, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना हे पॅनिक बटण महिलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. ही यंत्रणा विकसित करून पहिल्या पाच डब्यांमध्ये बसवण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागल्याचे माटुंगा कार्यशाळेचे मुख्य व्यवस्थापक महेश कुमार यांनी सांगितले. महिलांच्या डब्यात पॅनिक बटण बसवलेली पहिली लोकल सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email