Pages

Follow by Email

Saturday, 21 May 2016

समुद्र वाढतोय;4 कोटी लोकांचे अस्तित्व धोक्‍यात


न्यूयॉर्क - वैश्‍विक तापमानवाढीमुळे सृष्टीचे संतुलन ढळत चालले असताना समुद्राच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येते. सध्या समुद्राकाठच्या शहरांमधील नागरीकरण आणि आर्थिक विकासाचा वेग प्रचंड वाढला असताना या शहरांना पुराचा सर्वाधिक धोका निर्माण झाला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. 
"ग्लोबल एन्व्हायरोन्मेंट आऊटलूक (जीईओ- 6) : रिजनल ऍसेसमेंट‘ या अहवालामुळे संशोधक आणि पर्यावरणतज्ज्ञांची झोप उडाली आहे. प्रशांत, दक्षिण आणि आग्नेय आशियाला या पर्यावरणातील बदलाचा मोठा फटका बसू शकतो. समुद्राच्या पाणीपातळीमध्ये 2050 पर्यंत मोठी वाढ झाल्याने याचा फटका सागरकिनारी वास्तव्यास असणाऱ्या लोकसंख्येस बसेल. जगातील दहा देशांचे यामुळे नुकसान होणार असून, सात देश हे आशिया प्रशांतमधील आहेत. एकट्या भारतातील चार कोटी लोकांना याचा फटका बसणार असून, बांगलादेशातील 2 कोटी 50 लाख, चीनमधील 2 कोटी आणि फिलिपिन्समधील 1 कोटी 50 लाख लोकांना याचा फटका बसू शकतो. आशियाई देशांमधील नागरीकरणाचा वाढता वेग, वसाहतींचे बदलते स्वरूप, सामाजिक - आर्थिक दर्जांमध्ये झालेला बदल आदी बाबींमुळे या देशांना पर्यावरणातील प्रतिकूल बदलांचा धोका निर्माण झाला आहे. 

किनारी भागामध्ये नागरी वसाहतींचे प्रमाण वाढू लागल्याने याचा प्रतिकूल परिणाम नैसर्गिक किनारी व्यवस्थेवरही होतो आहे. त्यामुळे हे किनारे नैसर्गिक संकटांना सामोरे जाण्यासाठी पुरेसे सक्षम नसल्याचे आढळून आले. चीन, भारत आणि थायलंड या देशांना भविष्यामध्ये मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या ठिकाणी नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे, अशा ठिकाणांवर हे बदल अधिक प्रकर्षाने जाणवतील. 

या शहरांना धोका 
भारतातील मुंबई आणि कोलकाता, चीनमधील शांघाय आणि ग्वांग्झू, बांगलादेशातील ढाका, म्यानमारमधील यंगून, थायलंडमधील बॅंकॉक, व्हिएतनाममधील व्हो चि मिन्ह सिटी आणि हाय फॉंग या शहरांना धोका निर्माण झाला आहे. 2070 पर्यंत किनारी भागातील लोकांना तीव्र पुराच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

मर्यादित क्षमता 
काही शहरांना याआधीच पुराचा फटका बसला असून, काहींना भविष्यामध्ये बसू शकतो; पण त्या शहरांचे निश्‍चित भौगोलिक स्थान लक्षात घेता त्यांची या संकटांना सामोरे जाण्याची क्षमताही मर्यादित आहे. प्रशांत, दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांना याची जबर किंमत मोजावी लागणार असल्याचे हा अहवाल सांगतो. 

अन्य संकटे 
समुद्राची पाणीपातळी वाढल्याने याचा विपरीत परिणाम लाखो लोकांच्या जीवनमानावर होईल, यामुळे नैसर्गिक संकटांना तर सामोरे जावेच लागेल; पण त्याचबरोबर आर्थिक आणि पर्यावरणविषयक समस्यांची तीव्रता आणखी वाढेल. किनारी भागातील प्रदेशांना वादळांचा जबर फटका बसू शकतो. यामुळे विकसनशील देशांतील गरिबीची समस्या तीव्र होईल. 

वादळांचा फटका 
पुढील काही वर्षांमध्ये वादळांची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढणार असून बांगलादेश, चीन, भारत आणि फिलिपिन्स या देशांना याचा जबर फटका बसणार आहे. या सर्व देशांतील लोकांचा एकत्रित विचार केला तर 5 कोटी 80 लाख लोकांना याची किंमत मोजावी लागणार आहे, असे या अहवालातून स्पष्ट होते.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email